जळगाव लाईव्ह न्यूज । शेळ्यांना वाचवण्यासाठी रेल्वे रुळांकडे धाव घेतलेल्या एका महिलेचा आणि तब्बल १५ शेळ्यांचा महाराष्ट्र एक्सप्रेसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खुमगाव बुरटी रेल्वे स्थानकाजवळ घडली. लताबाई सांगळकर (वय ५८) असं मयत महिलेचं नाव असून या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खुमगाव बुरटी येथील रहिवासी लताबाई सांगळकर या नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास काही शेळ्या रेल्वे रुळांच्या दिशेने गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेळ्यांना परत आणण्यासाठी त्या रुळांजवळ गेल्या असताना भरधाव वेगाने धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस तेथून जात होती.

रेल्वेगाडीचा वेग आणि अंतर याचा अंदाज येण्यापूर्वीच लताबाई यांना गाडीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेमुळे रेल्वे रुळांवर असलेल्या १५ शेळ्यांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलीस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.
लताबाई सांगळकर या कुटुंबाचा प्रमुख आधारस्तंभ मानल्या जात होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे रुळांच्या परिसरात जनावरांना चारताना आणि रेल्वे मार्ग ओलांडताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.










