⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

वादळी वाऱ्याचा तडाखा, चोपडात पाचशे हेक्टर वरील केळी बागा जमीन दोस्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । राज्यासह जिल्ह्यात अनेक भागाला मान्सून पर्व पावसाच्या वादळी वाऱ्याने झोडपून काढेल आहे. चोपडा तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पाच महसूल मंडळातील १७ गावांमधील ७९२ केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाचशे हेक्टर क्षेत्रावरील केळी बागा जमीन दोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अर्धा तास चाललेल्या वादळात होत्याचे नव्हते झाले. दि. ९ रोजी झालेल्या वादळामुळे केळी उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे. दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून, नेहमी येणाऱ्या संकटांना कसे तोड द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यां पुढे आहे. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे होऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

चोपडा तालुक्यात दि.९ जून रोजी गुरुवारी रात्री ९ वाजता आकाशात ढगांची जमावा जमव होऊन विजांचा प्रचंड गडगडाट होऊन रात्री १० वाजेनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने तुरळक हजेरी लावली. वादळामुळे चोपडा, गोरगावले बु!,अडावद, धानोरा या चार महसूल मंडळातील गावांमध्ये पाचशे एकर क्षेत्रावरील केळी बागा जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत तक्रारी आल्याने तहसीलदार अनिल गावित यांच्या आदेशाने शुक्रवारी संबधित मंडळ अधिकारी,तलाठी कर्मचारी यांनी चोपडा, गोरगावले बु!,अडावद,धानोरा महसूल मंडळात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.पाहणीत प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५००.७५ हेक्टर क्षेत्रावरील केळी बागांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त नुकसान गोरगावले बु! महसूल मंडळात झालेले आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. आधीच संकटात सापडलेला शेतकऱ्यांपुढे वादळाचे संकट म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल.शेतकऱ्याने किती संकटे सहन करायची हा गंभीर प्रश्न त्याच्यापुढे उभा आहे. केळी बागांचे तात्काळ पंचनामे होऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळावी.तसेच पिक विमा कंपन्या अशा प्रकाराकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करून आर्थिक नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करतात असा आज पर्यंतचा अनुभव आहे. म्हणून शासनाने केळी पिक विमा कंपन्यांना योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.