जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२४ । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि महानगर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याची उत्सुकता पक्षात निर्माण झाली आहे. पक्षाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज इच्छुकांच्या मुलाखती जळगावात घेणार आहेत. पक्षाची गेल्या आठवड्यात बैठक झाली होती.
त्यात जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष यांच्यासह इतर सर्व कार्यकारिणीचे राजीनामे घेऊन नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा विषय एकमताने मंजूर करण्यात आला होता. लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने नवीन पदाधिकारी निवडले जावेत. यावर पक्षात चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. सतीश पाटील किंवा गुलाबराव देवकर यांनी जबाबदारी घ्यावी, या दोघांकडे संघटनेचा अनुभव आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. जिल्ह्यातील राजकारणाची नस त्यांना चांगलीच माहित आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी होकार द्यावा, असे मत पक्षातून व्यक्त होत आहे. त्यांनी नकार दिला, तर जिल्हा समन्वयक विकास पवार, श्रीराम पाटील, ओबीसी चेहरा म्हणून नामदेव चौधरी, डी. के. पाटील, पंकज महाजन, तसेच अल्पसंख्यांक समाजातून एजाज मलिक यांची नावे जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत, याशिवाय दोन कार्याध्यक्ष असणार आहेत. महानगर अध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट सचिन पाटील व शालीग्राम मालकर यांच्या नावाची चर्चा आहे, पण दुसरा इच्छुकही समोर येऊ शकतो