⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी पोरगं म्हनलं.. काय चिखल, काय घाण, काय कालीज, काय रस्ते एकदम ओक्केमधी हाय..

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । शिवसेनेत फूट पाडून शिवसेनेचे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक आमदार रातोरात सुरतला गेले. तेथून विमानाने गुवाहाटीला (आसाम) गेले. तेथील पंचतारांकित हॉटेल, जेवण, झाडी, डोंगर पाहून आपल्या मित्राला आमदार शहाजी बापू सांगतात की, काय मज्जा आहे, सर्वच झक्कास… काय हाटील, काय डोंगार, काय झाडी एकदम ओके… हे वर्णन सोशल मीडियावर खूपच भाव खात असून आमदार शहाजी बापू रात्रीतून एकदम फेमस झाले आहेत. अनेक ठिकाणी भाषणांमधून देखील कोणाची टराटरा उडवायची असेल तर लगेच म्हणतात काय डोंगार…

एरंडोलला देखील असाच सुखद अनुभव पहिल्याच दिवशी कॉलेजला गेलेल्या तरूणाने कसं होतं कॉलेज… यावर बोलला की, काय चिखल, काय घाण, काय कालीज, काय सां. बा. रस्ता एकदम ओकेमधी हाय..हा किस्सा आहे. एरंडोल येथील म्हसावद रस्त्यावरील कॉलेजचा कारण कॉलेजचा पहिला दिवस, त्यातच नवीन छान ड्रेस घातलेला, गॉगल लावून चाललेला म्हसावद नाका ते कॉलेज अवघे १०० मीटर अंतर पण पहिल्याच पावसात रंगाचा बेरंग झालेला रस्ता त्यातच रिक्षा, मोटार सायकल यांचे जोरात जाणे-येणे अंगावर घाण पाणी (चिखल) उडविणे, पोरींचे हसणे, गंमत करणे पाहून ऐटीत चालणारा कॉलेजकुमार म्हणतो वारे वाहा.. काय चिखल, काय घाण, काय कालीज, काय सां. बा. रस्ता, काय पोरी एकदम ओके…

सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत असून निदान आता तरी ही दुर्दशा दूर व्हावी. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीवर्गाने एकदातरी पायी चिखल तुडवीत सदरचे १०० मीटर अंतर चालून दाखवावे…तेही म्हणल्याशिवाय राहणार नाहीतच वाह..व्वा… काय चिखाल, काय घाण, काय कालीज, काय सां. बा. रस्ता एकदम ओके… दुसरे काय ?…