⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

Big Breaking : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार, आ.गुलाबराव पाटलांचा मोठा दावा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दोन दिवसीय अधिवेशनात आ.गुलाबराव पाटील यांनी दमदार बॅटिंग केल्यानंतर ते घरी परतले आहे. आम्ही शिवसेना (Shivsena) पक्ष वाचवण्यासाठी उठाव केला. विधानसभेमध्ये शिवसेना गट म्हणून आम्ही बसलो आहोत. येणाऱ्या काळात शिवसेना म्हणून आमच्या गटाला मान्यता मिळेल व संख्याबळावर धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळेल, असा दावा आ.गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले आहे.

राज्यात विधान परिषद निवडणूक आटोपल्यापासून सुरु असलेले सत्तांतर नाट्य दोन दिवसापूर्वी संपुष्टात आले. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे गटात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आ.लता सोनवणे, आ.किशोर पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. तब्बल १३ दिवसानंतर गुलाबराव पाटील जळगावात आले होते. यावेळी त्यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. ढोलताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. गुलाबराव पाटील यांच्यासोबत तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

घरी परतल्यानंतर आ.गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक गौप्यस्फोट केले. तसेच बंड केलं त्याचं कारण देत आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावाही त्यांनी केला. इतकंच नव्हे तर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मगच आमच्यावर बोलावं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. आ.पाटील म्हणाले, शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार आणि २० माजी आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोटही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. काही खासदारांना आपण भेटलो असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे, असंही त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Assembly Live : अजितदादा आमच्या निवडून येण्याची चिंता तुम्ही करू नका : आ.गुलाबराव पाटील

आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. उलट शिवसेना आम्ही वाचवली आहे. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे ती आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत. उद्धव ठाकरे यांना फसवले असून अजूनही उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करावं, असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंना सोडणार नाही हा कार्यकर्त्यांना विश्वास होता. मात्र उद्धव ठाकरेंना आम्ही सोडलं नाही, उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सोडलं. वेळोवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला, असा दावा त्यांनी केला.