⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

शिवसैनिकांना लढायचे असेल तर सोबत राहा – उद्धव ठाकरे

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे, असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. हिम्मत असले तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा असे उद्धव ठाकरे म्हणाले.

याच बरोबर ते म्हणाले की, सध्याच्या घटनेवरून त्यांनी राज्यात कशापद्धतीने घटनेची पायमल्ली करून कारभार सुरू आहे, याची माहिती दिली. एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, यावर त्यांनी बोट ठेवले.

राज्यात राज्यघटना आहे, की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनातज्ज्ञांना विनंती आहे, की आपण घटनातज्ज्ञ आहात. सध्या जे सुरू आहे ते घटनेला धरून सुरू आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरू आहे, त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा, असे आवाहन त्यांनी केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या, असे ते म्हणाले. त्याचबरोबर असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल आणि तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.