⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Assembly Live : संजय राऊत म्हणाले म्हणून आम्ही २० आमदार शिंदेंसोबत गेलो : आ.गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांना बोलावून सांगितले. कोरोना काळात विचारणा केली. आमच्यावर उपकार मंत्री केले पण आम्हाला माहिती होते इथे शिवसेना संपणार आहे. भास्कर जाधवांनी काळजी करायची गरज नाही, आम्ही आपसात भांडणार नाही. वारंवार आमच्यावर आरोप केले. तुम्ही गद्दार आहेत, गटारीचे पाणी आहेत, डुक्कर आहेत, तुमचे प्रेत बाहेर आहेत. तुम्ही वरळी वरून जाऊन दाखवा असे सांगण्यात आले. अरे धमकी द्यायचा धंदा आमचा पण आहे. आम्ही काही लेचेपेचे आमदार नाही. मनगटात जोर असलेला माणूस मैदानात येतो आणि सरकारमध्ये सामील होतो. शिवसेना संपू नये म्हणून शिवसेना वाचवायला आम्ही तिकडे गेलो, असा घणाघात आ.गुलाबराव पाटील यांनी केला.

विधानमंडळातील विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना आ.गुलाबराव पाटील यांनी जोरदार भाषण केले. आ.पाटील म्हणाले, बाळासाहेब आमच्या हृदयात होते, आहेत आणि राहतील. बाळासाहेब महापुरुष आहेत. आमदारांच्या नाराजी आम्ही सांगत होतो. अजितदादांचा आम्हाला हेवा वाटायचा, सकाळी ६ वाजता कार्यकर्त्यांचा फोन घ्यायचे, असे ते म्हणाले. आम्ही कसे गेलो काय गेलो अनेक प्रश्न उपस्थित झाले. सुरुवातीला केवळ १५ आमदार तिकडे गेले तेव्हा आम्ही २० आमदार संजय राऊत यांच्याकडे गेलो. मला कुणाचे नाव घ्यायचे नाही पण तेव्हा आम्ही सांगितले कि ते गेले त्यांना समजावा, परत बोलवा पण ते म्हणाले तुम्हाला पण जायचं असेल तर जा, असा गौप्यस्फोट आ.गुलाबराव पाटील यांनी केला.

एक-दोन नव्हे ३५ आमदार बाहेर जाताय. एकदा निवडून आलेला गेला असता तर समजू शकलो असतो पण ५ वेळा आमदार असलेले, मंत्री देखील जात असल्याने काहीतरी विचार करायला हवा होता. आम्ही पक्षासाठी बाहेर आलो तरी आम्हाला बंडखोर म्हटले जातेय. अरे तुम्ही आम्हाला ‘या चिमण्यांनो परत या, या पाखरांनो परत फिरा’ असे म्हणायला हवे होते. चार चौकडींनी आमच्या उद्धव साहेबांना बावळट केले. ज्यांची निवडून यायची लायकी नाही ते आमच्यावर बोलतात. आमची मते घेऊन खासदार होतात. आम्हाला डुकरांची पिल्ले म्हणतात, अरे या डुकरांची मते घेऊन तुम्ही निवडून आलात. शिवसेना वाचवायला फक्त एकनाथ शिंदे फिरलेत. जळगावात ५वेळा येऊन गेले. शरद पवार ३ वेळा आले, अजित पवार ३ वेळा आले. आम्ही परत आमच्या घरी आलो आहोत, असे सांगायचा आम्हाला अभिमान वाटतो असे आ.पाटील म्हणाले.
हे देखील वाचा : Assembly Live : अजितदादा आमच्या निवडून येण्याची चिंता तुम्ही करू नका : आ.गुलाबराव पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी ४० आमदार असलेल्या शिवसेनेच्या माणसाला मुख्यमंत्री केल्याने स्व.बाळासाहेबांचे स्वप्न साकार केल्याने मी त्यांचे आभार मानतो, आ.पाटील म्हणाले. पूर्वी जास्त आमदार असताना देखील राष्ट्रवादीने काँग्रेसचे मुख्यमंत्री केले. आम्ही हे तुमच्याकडूनच शिकलो आणि आमचा मुख्यमंत्री झाला. तुमच्या माणसांना तुमच्याकडून लांब करण्यात आले. ते लांब गेलेले नाही. धृतराष्ट्रप्रमाणे डोळ्यांवर पट्टी बांधत सल्ला देणाऱ्यांना दूर करा. आम्हाला बाळासाहेबांच्या मुलाला दुःख करायची इच्छा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुमच्याकडून जनतेची अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राची सेवा करण्याची शक्ती आपणस लाभो, अशी प्रार्थना करून आ.गुलाबराव पाटील यांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.