जळगावात मध्यरात्री दोन गटांत तुफान दगडफेक; पोलिसांवरही हल्ला, परिसरात तणावपूर्ण शांतता

जून 18, 2026 9:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२६ । जळगाव शहरातील तांबापुरा भागातील बिस्मिला चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान तुफान दगडफेकीत झाल्याची धक्कादायक घटना घडली. महिला आणि एका तरुणामधील वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या हिंसक घटनेत दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दोन्ही गटांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पहाटे उशिरापर्यंत सुरू होती.

gadafek

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास एका महिलेमध्ये आणि तरुणामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. मात्र, या वादाचे पर्यावसान काही वेळातच दोन गटांमधील मोठ्या संघर्षात झाले. वाद वाढल्याने दोन्ही बाजूंचे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाले आणि त्यांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत दोन घरांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नियंत्रण सुटलेल्या संतप्त जमावाने पोलिसांनाही सोडले नाही. जमावाकडून पोलिसांच्या वाहनांवर आणि कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून रात्री साडेएक वाजेच्या सुमारास संपूर्ण परिसरात अतिरिक्त पोलीस बलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील दंगलखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पहाटे उशिरापर्यंत सुरू होती. सध्या तांबापुरा आणि बिस्मिला चौक परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस नागरिकांना शांततेचे आवाहन करत असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now