⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

पाचोऱ्यात आमदार पाटीलांच्या हस्ते गावठाण मोजणीस प्रारंभ

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२। शासनाच्या स्वामीत्व योजने अंतर्गत गावठाण मधील जमिनींच्या ड्रोन मोजणी अभियानास पाचोरा तालुक्यात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता आ.किशोर पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. स्वामीत्व योजनेअंतर्गत राज्यातील गावठाण भागातील आठ अ ला ग्रामपंचायत उताऱ्यावर लावलेल्या जमिनींची ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करून त्याच्या मिळकत पत्रिका तयार केल्या जाणार असून यामुळे गावागावातील वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद मिटण्यासाठी मदत मिळणार असुन या मोजणीचा आगामी १०० वर्षे फायदा मिळणार आहे तसेच मिळकत धारकांचे नावे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार असल्याने त्यांना शासनाच्या घरकुलासह तारण, गृहकर्ज आदी लाभ मिळणार असल्याने ग्रामस्थांमधून या योजनेचे स्वागत होत असल्याचे चित्र आहे.

पाचोरा तालुक्यातील आ.किशोर अप्पा पाटील यांचे मुळगाव अंतुर्ली येथून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, भूमीअभिलेख अधिकारी राजू घेटे, यशवंत बिऱ्हाडे,मोजणी अधिकारी उगल मुगले चौधरी, सरपंच तुळसाबाई पाटील, उपसरपंच प्रदीप लक्ष्मण पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आ. किशोर अप्पा पाटील यांनी राज्य शासनाच्या या योजनेच्या या योजनेचे कौतुक करत यामुळे आपसातील तंटे सुटण्यास मदत मिळणार असल्याने गावा गावात सलोखा निर्माण होण्यास यामुळे मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन करून ग्रामस्थांनी या ड्रोन मोजणी अधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष बंडू चौधरी, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.