जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील एसबीआय एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड चोरी करण्याचा प्रयत्न पाचोरा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. या प्रकरणात पोलिस कर्मचारी हरिशकुमार अहिरे व बजुसिंग बंजारा यांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिस अधिक्षकांनी बोलावून या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

काय आहे घटना
बुधवारी पहाटे ३:४५ वाजेच्या सुमारास पाचोरा शहरापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असलेल्या जारगाव येथील सारोळा रस्त्यावरील एसबीआयच्या एटीएम केंद्रात काही अज्ञात व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पाचोरा पोलीस ठाण्याचे हवालदार हरिशकुमार अहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच एटीएम मशीन गॅस कटरने कापण्यात आल्याचे आढळून आले. मशीनमधील रोख रक्कम असलेले कॅश कॅबिनेट बाहेर काढून ते काळ्या रंगाच्या क्रेटा कारमध्ये ठेवण्याची तयारी सुरू होती. घटनास्थळी तीन संशयित तरुण उपस्थित होते. मात्र, पोलिसांना पाहताच त्यांनी कॅश कॅबिनेट तिथेच सोडून वाहनातून तारखेडा मार्गे पलायन केले.या कारवाईमुळे एटीएममधील तब्बल ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांची रोकड सुरक्षित राहिली.
पोलिस कर्मचारी हरिशकुमार अहिरे व बजुसिंग बंजारा हे घटनास्थळी अवघे दोन मिनिटे उशिरा पोहोचले असते, तर चोरटे ९ लाखांची रोकड घेऊन पसार झाले असते. त्यांच्या या अतुलनीय धैर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. बुधवारी सायंकाळी पोलिस अधिक्षकांनी बोलावून या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.












