⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत अभिनेता रमेश देव (वय ९३) यांचे बुधवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. देव यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, मुलगा अभिनेता अजिंक्य देव, दिग्दर्शक अभिनय देव, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी दुपारी अडीच वाजता पारसी वाडा, विलेपार्ले पूर्व येथे रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

रमेश देव अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929 कोल्हापुर, महाराष्ट्रात झाला. ‘आनंद’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. 1956 साली रमेश देव यांनी ‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर ‘आरती’ हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता. रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी ‘पैशाचा पाऊस’ आणि ‘भाग्यलक्ष्मी’ या चित्रपटांत काम केले.

रमेश देवांचं खरं नाव ठाकूर ते मुळचे राजस्थानचे. त्यांचे वडिल कोल्हापूरमधील प्रख्यात फौजदारी वकील होते. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचे ठाकूर नाव बदलून देव केले होते. रमेश देव हे चित्रपटसृष्टीतील राजबिंडं व्यक्तिमत्व. त्यांच्या देखणेपणावर त्या काळी अनेक मुली फिदा होत्या. आलिया भोगाशी सिनेमाच्या वेळी रमेश देव आणि सीमा देव एकत्र आले आणि तेथेच त्यांच्यात प्रेमांकुर फुलले. त्या काळी हे दोघे ज्या सिनेमात असतील तो सिनेमा हिट होणारच असे म्हटले जात असे. राजबिंडं रुप असलं तरी रमेश देव यांनी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकाही केल्या. मराठीतील खलनायक रुबाबदार असू शकतो हे त्यांनी दाखवून दिले होते. आणि विशेष म्हणजे त्यांच्या या भूमिका प्रचंड गाजल्याही आणि प्रेक्षकांनी डोक्यावरही घेतल्या होत्या. आनंद चित्रपटातील त्यांची भूमिका राजेश खन्ना, अमिताभ सोबतच आजही आठवली जाते 1962 मध्ये अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांच्यासोबत लग्न केले. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले. या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले.

हे देखील वाचा :