⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

वासुकमल विहार प्रकरण : काबरा बिल्डरसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । खरेदीखतात नमुद कारपेट क्षेत्राचा फ्लॅट न देता तसेच जळगाव महानगर पालिकेच्या मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम केले नसल्याच्या व इतर विविध आरोपाखाली जळगाव येथील वासुकमल बिल्डर्सचे संचालक नरेंद्र काबरा व इतरांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नरेंद्र झिपरुलाल काबरा, लव नरेंद्र काबरा दोघे रा.७१, वासुकमल, नवीपेठ, जुने बस स्टॅंड समोर जळगाव, रौनक जैन रा.संगम सोसायटी रिंगरोड जळगाव, शितल विशाल लाठी, गायत्री राठी दोघे रा.वासुकमल विहार गुजराल पेट्रोल पंपासमोर जळगाव अशा एकूण पाच जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी चेतन कपोले यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवकॉलनी ते गुजराल पेट्रोलपंप दरम्यान महमार्गालगत वासुकमल विहारमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी बिल्डरविरुद्ध गेल्या काही महिन्यांपासून तक्रारी सुरू केल्या होत्या. शहर पोलीस ठाणे, बिल्डरचे कार्यालय, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रारदार रहिवासी पोहचले होते. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांकडे देखील याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. बिल्डरविरुद्ध तक्रारीसाठी रहिवासी आक्रमक होते. अखेर शुक्रवारी याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार दि.६ सप्टेंबर २०२० पासून १० मार्च २०२२ या कालावधीत फिर्यादी व इतर फ्लॅटधारकांना खरेदीखतात नमुद कारपेट क्षेत्राचा फ्लॅट देण्यात आला नाही. जळगाव मनपाच्या मंजूर नकाशानुसार बांधकाम करुन देण्यात आले नाही. फ्लॅट बुकींगच्या वेळी देण्यात आलेल्या माहिती पुस्तीकेनुसार नमुद सुख सुविधा न देता परस्पर वासुकमल विहार फ्लॅट ओनर्स असोसिएशनची स्थापना करुन संगनमत व कटकारस्थान करुन सौ.शितल विशाल लाठी यांना ते फ्लॅटधारक नसतांना सोसायटीचे अध्यक्ष केले. अशा विविध आरोपांचा फिर्यादीत समावेश आहे. पुढील तपास पो.नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करत आहेत.