ऐन थंडीत पुन्हा जळगावात अवकाळी पावसाचं संकट? IMD कडून महत्वाचा इशारा

जानेवारी 26, 2026 9:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२६ । जळगावसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढ-उतार दिसत आहेत. हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. प्रजासत्ताक दिनी जळगावसह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे थंडी काहीशी कमी होऊन उकाडा जाणवेल.

Rain

उत्तर भारतातील पश्चिमी चक्रावातामुळे राज्यात ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी हलका पाऊस बरसू शकतो.

जळगाव जिल्ह्यात रविवारी धुरकट आणि अंशतः ढगाळ वातावरण होते. तर आज हवामान खात्यानं वर्तविलेल्या अंदाजानुसार, जळगावमध्ये आज सोमवारी ढगाळ वातावरणाची तीव्रता वाढणार असून, हलक्या पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. या दिवशी किमान तापमान १६ अंशांपर्यंत वाढून रात्रीचा गारठा कमी होईल. २७ जानेवारीपासून मात्र आकाश पुन्हा निरभ्र होईल.

सकाळी धुके, दुपारी उन्ह
जळगावकरांना २९ आणि ३० जानेवारी रोजी पहाटे दाट धुक्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सकाळी दृश्यमानता कमी असेल. मात्र दुपारी सूर्यप्रकाश प्रखर असल्याने तापमान ३० अंशांपर्यंत पोहोचेल. दिवसा उन्हाचा चटका व पहाटे धुके असे वातावरण राहील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now