⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

दूध संघातील चव्हाण यांच्या विजयापेक्षा पाटलांचे मौन जास्त चर्चेत

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ डिसेंबर २०२२ | चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथराव खडसे (पर्यायी मंदाकिनी खडसे) यांचा दूध संघात दारुण पराभव केला. केलेल्या या कामगिरीचे त्यांना चांगले फळही मिळाले. दूध संघाचे मंगेश चव्हाण बिनविरोध अध्यक्ष झाले. मात्र जितकी या गोष्टीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. त्याहून अधिक चर्चा अजून एका गोष्टीची सुरू आहे ती म्हणजे, झालेल्या या सगळ्या घडामोडीनंतर अजून सुद्धा जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी एकही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार उमेश पाटील यांच्यातील वैर आता काही लपून राहिलेलं नाही. संपूर्ण जळगाव जिल्ह्याला यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाची कल्पना आहे. खासदार झाल्यामुळे उन्मेष पाटील यांचा जनसंपर्क तसा कमी झाला आहे. मात्र दुसरीकडे मंगेश चव्हाण आमदार झाल्याने त्यांचा जनसंपर्क उन्मेष पाटील यांच्या पेक्षा खूप जास्त वाढला आहे. पर्यायी मंगेश चव्हाण यांना गेल्या काही वर्षापासून चांगल्या संधी मिळत आहेत त्याचा फटका हा उन्मेष पाटील यांना बसत आहे.

दूध संघाच्या निवडणुकी वेळी देखील संपूर्ण भारतीय जनता पक्ष हा प्रचारासाठी उतरला असताना खासदार उन्मेष पाटील त्यावेळी प्रचारात दिसले नाहीत. याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात जोरदार झाली. त्यानंतर आलेल्या निकाला वेळी संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र असताना त्या ठिकाणी उन्मेष पाटील नव्हते व खासदार उन्मेष पाटील यांनी साधी प्रतिक्रिया ही नोंदवली नाही. याची चर्चा देखील जोरदार झाली आणि आता अध्यक्ष निवडीनंतर देखील उन्मेष पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पक्ष म्हटलं की आपापले मतभेद विसरून एकत्र यायचं असतं. उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यातले असलेले मतभेद आता काही नवीन राहिलेले नाहीत. मात्र दूध संघासारख्या निवडणुकीत जी भारतीय जनता पक्षाने इतकी प्रतिष्ठेची केली होती. त्यात विजय मिळाला तरी देखील भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला साध्या शुभेच्छा देत नाहीत यामुळे पक्षांतर्गत आणि संपूर्ण जिल्ह्यात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.