शेतकऱ्याच्या घामावर कुऱ्हाड! यावल शिवारात अज्ञात माथेफिरूने कापली १७०० केळीची झाडे; लाखांचे नुकसान

मे 16, 2026 6:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील अट्रावल येथील एका शेतकऱ्याच्या यावल शिवारातील शेतात घुसून अज्ञात माथेफिरूने केळीची तब्बल १ हजार ७०० झाडे कापून फेकून दिल्याने शेतकऱ्याचे अंदाजे ६ लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले असून, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात विकृताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bn

नेमका काय आहे प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, अट्रावल येथील रहिवासी किरण महाजन यांचे यावल शेत शिवारात केळीचे शेत आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने आणि आर्थिक भांडवल उभारून केळीची बाग फुलवली होती. मात्र, जेव्हा अज्ञात माथेफिरूने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेतात प्रवेश केला आणि हाताशी आलेल्या केळीच्या बागेतील तब्बल १७०० झाडे धारदार शस्त्राने कापून जमिनीवर पाडली. यामध्ये शेतकऱ्याचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे, अट्रावल आणि यावल शेत शिवारात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षीही याच पद्धतीने वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेचे अतोनात नुकसान करण्यात आले होते. वर्ष उलटत नाही तोच पुन्हा त्याच प्रवृत्तीने डोके वर काढल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वर्षभर रक्ताचे पाणी करून वाढवलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी किरण महाजन पार कोलमडून गेले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. शेतकरी किरण महाजन यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात माथेफिरू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या विकृताचा कसून शोध घेत आहेत. या समाजकंटकाला तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now