⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

दुर्दैवी : परीक्षा देऊन परतणाऱ्या दुचाकीस्वार मित्रांवर काळाची झडप, अपघातात मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । रावेर तालुक्यातील रहिवासी असलेले दोन तरुण नाशिकहून परीक्षा देऊन घरी परत असताना ‘त्या’ दोघांचा वाटेतच अपघाती मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री १०.३० वाजता आशिया महामार्गावर जैन इरिगेशन कंपनीसमोर घडली. यश वासुदेव महाजन (२३ रा. तिरुपती नगर, रावेर) आणि सुमित दिवाकर पाटील (२४, पुनखेडा ता. रावेर) अशी या ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

तालुक्यातील ऐनपूर येथील मूळ रहिवासी असलेले प्रगतिशील शेतकरी वासुदेव नारायण महाजन व कांचन महाजन हे मुलगा यश याच्या शिक्षणासाठी तिरुपती नगरात राहतात. तो एकुलता मुलगा होता.

सुमित हे दोन्ही बांधकाम पर्यवेक्षकपदाची लेखी परीक्षा देण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे गेले होते. दिंडोरी येथे परीक्षा दिल्यानंतर हे दोन्ही जण नाशिकहून मोटारसायकलने रावेरकडे निघाले. दोघे जण नाशिकहून जळगावच्या जवळ येऊन पोहचले. बुधवारी रात्री १०.३० वाजता बांभोरी नजीकच्या जैन इरिगेशनसमोर जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकने समोरून मोटारसायकलला जबर धडक दिली. यात यश हा जागीच ठार झाला तर सुमित हा गंभीर जखमी झाला होता. त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पालकांना अपघाताची माहिती मिळताच दोन्ही परिवार रात्री १२ वाजता जळगावात दाखल झाले. गुरुवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुमित याच्यावर सकाळी १०.३० वाजता तर यश याच्यावर दुपारी तीन वाजेच्या सुमारास अत्यंत शोकाकूल अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे देखील वाचा :