जळगाव लाईव्ह न्यूज । दिनेश चौधरी । पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे दि. ११ रोजी २५ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेने परिसरात शोककळा पसरली. काल सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निलेश पाटील (वय 25) असे मयत तरुणाचे नाव आहे. निलेश हा गुरुवारी सकाळी ७च्या सुमारास शेतात जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेला होता. मात्र, वैराणाखाली असलेल्या विषारी सर्पाने दंश केला. दरम्यान, त्याला चक्कर यायला लागले. त्याच अवस्थेत तो घरी चालत आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून नीलेशची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेण्यास सांगितले.
जळगाव जात असताना रस्त्यातच नीलेशची प्राणजोत मावळली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी नीलेशला तपासणीअंती मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेहाला लोहारा येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. निलेशने जळगाव येथे डी. फार्मची पदवी घेतली होती. तो गोवा येथे नोकरीसाठी गेला होता. सुट्टी असल्याने तो गावी आलेला होता. नोकरी करून घर बांधेल, असे तो घरच्यांना सांगत होता. असे वडील टाहो फोडत सांगत होते. खूप मोठी स्वप्ने बघितली होती. निलेशच्या जाण्याने सर्व धुळीस मिळाली. निलेश हा शांत व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याने सर्वांची मन जिंकून घेतली होती. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून, त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नीलेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.