⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

10 हजाराची लाच भोवली ; खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२४ । पंतप्रधान आवास योजना मंजूर करून देण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारताना एक खाजगी पंटरला जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. शेख हुसेन शेख बद्दू (वय ४०, रा. कुऱ्हाडदे बुद्रुक ता. पाचोरा) असे या लाचखोर पंटरचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली.

याबाबत असे की तक्रारदार यांनी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज केला होता. मात्र कामी मंजूर करून आणून देण्याकरिता संशयित शेख हुसेन शेख हुसेन याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. यांनतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शेख हुसेन याला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. त्याच्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सदरचा इसम हा कायम ग्रामपंचायतमध्ये राहून गावातील लोकांना वेगवेगळ्या भूलथापा देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन जागा नावे लावणे, उताऱ्यावर नावे लावणे, फेरफार नोंदी करणे, शासनाकडून देण्यात येणाऱ्या घरकुल, वैयक्तिक शौचालय व इतर योजना मिळवून देण्यासाठी पैसे घेऊन काम करत होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.