⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

अनधिकृत गाळे हस्तांतरण करणाऱ्यांचे गाळे होणार सील

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुन २०२३ । महानगरपालिकेकडून बी.जे.मार्केट व गोलाणी मार्केटमधील गाळेधारकांना नोटीसा बजाविण्यात आल्या असून सदर गाळेधारकांनी आप आपले गाळे अधिकृतपणे हस्तांतरीत करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु तरी देखील काही गाळेधारकांकडून गाळे हस्तांतरण करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे संबधित गाळेधारकांचे गाळे सील केले जाणार असल्याची माहिती मनपा उप आयुक्त गणेश चाटे यांनी दिली आहे.

सन २०१३ पासून महापालिकेच्या व्यापारी संकुलामधील गाळे हस्तांतरणाची प्रक्रिया बंद होती. मनपाकडून हस्तांतरणाचे धोरण निश्चित होत नसल्यामुळे अनेक गाळेधारकांनी अनधिकृतपणे परस्पर गाळे हस्तांतरीत करून घेतले होते. त्यामुळे त्या गाळेधारकांना महापालिकेने नोटीसा पाठवून आपआपल्या गाळ्यांचे अधिकृतपणे हस्तांतरण करून द्यावे अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार ४५ गाळेधारकांनी महापालिकेत गाळे हस्तांतरणाचे प्रस्ताव दिले होते. त्यांना मनपा प्रशासनाने रितसर गाळे हस्तांतरण करून दिले आहेत. तसेच आता पुन्हा १० गाळेधारकांनी अर्ज सादर करून आपले गाळे हस्तांतरीत करून द्यावेत, अशी मागणी केली आहे. मात्र, अद्यापही ३०० ते ४०० दुकानदारांकडून गाळे हस्तांतरणासाठी अर्ज करण्यात आलेले नाहीत त्यामुळे संबधित दुकानदारांची गाळे सील करण्यात येणार आहेत.

गोलाणी मार्केट व बी.जे. मार्केटमधील ४५ गाळेधारकांनी महापालिकेकडे गाळे हस्तांतरणाचे प्रस्ताव दिले होते. त्यांना मनपा प्रशासनाने रितसर गाळे हस्तांतरीत करून दिले असून या बदल्यात पालिकेला ७४ लाख रुपयांचा महसूल देखील मिळाला आहे.

गेल्या १० वर्षांपासून गाळे हस्तांतरणाची प्रक्रिया धोरण ठरलेले नसल्यामुळे बंद होती. त्यामुळे महापालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत होता. त्यामुळे चार महिन्यापुर्वी महापालिकेने गाळे हस्तांतरणाचे धोरण निश्चित केले असून पहिल्या मजल्यावरील दुकानांसाठी रेडीरेकनरच्या १५ टक्के व वरील सर्व मजल्यांसाठी १० टक्के रक्कम आकारण्यात आली आहे.