⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | बातम्या | काँग्रेस-राष्ट्रावादीसोबतची साथ उध्दव ठाकरेंच्या डोक्याला ताप!

काँग्रेस-राष्ट्रावादीसोबतची साथ उध्दव ठाकरेंच्या डोक्याला ताप!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २०१९ साली भाजप व शिवसेनेने विधानसभा निवडणूक एकत्र लढवली. भाजपला 105 जागा आणि शिवसेनेला 56 जागा असे 161 जागांचे बहुमत महायुतीला मिळाले. पण मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडली. त्यानंतर शिवसेनेनं ज्यांच्याविरोधात राजकारण केलं, टीका केली त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केली आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री झाले. नगरसेवक पदाचा अनुभव नसलेला व्यक्ती थेट राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसल्यावर उद्धव ठाकरे यांना ना धड सरकार चालवता आले, ना पक्ष टिकवता आला. येथूनच महाराष्ट्राचे राजकारण गढूळ व अस्थिर झाले.

उद्धव यांच्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. सरकार प्रभावीपणे चालविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. मुख्यमंत्री कार्यालयातील त्यांच्या दुर्मिळ भेटी आणि विधीमंडळात विरोधकांच्या प्रश्नांना अपुरी उत्तरे यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर अकार्यक्षम मुख्यमंत्र्याचा शिक्का मारला. मात्र हा शिक्का उध्दव ठाकरेंना शेवटपर्यंत पुसता आला नाही. एकीकडे प्रशासकीय पातळीवर अपयशाचा शिक्का बसल्यानंतर दुसरीकडे पक्ष पातळीवर देखील त्यांना मोठं अपयश आलं असं म्हणावे लागेल. कारण नंतर शिवसेना पक्ष कसा फुटला, किती मंत्री व आमदार उध्दव ठाकरेंना सोडून गेलं व त्यातून उध्दव ठाकरेंच्या हाती काय लागलं? हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे.

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड
एकेकाळी मातोश्रीचा असा दरारा होता की, दिल्लीतील कितीही मोठा नेता असला तरी त्याला मातोश्रीवरच यावे लागत होते. मात्र आता उध्दव ठाकरेंच्या वारंवार होणाऱ्या दिल्लीवाऱ्यांमुळे बाळासाहेंबांच्या शिवसैनिकाचे मन व्यथित झाल्याशिवाय राहत नाही. मुख्यमंत्री बनण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे त्यांना शिवसेना आणि त्यांचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिष्ठेशी व विचारांशी तडजोड करावी लागली, याचं दुख: अनेकांना वाटते. एकंदरीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या निवडणुकीतील लाभासाठी उद्धव यांचा गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस आणि शरद पवारांचा डाव ?
काँग्रेस नेते आणि शरद पवार यांनी उद्धव यांना आघाडी सरकारमधील कमकुवत दुवा मानून त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीत स्वत:साठी अधिक जागा मिळवून उद्धव ठाकरे यांची स्थिती कमकुवत करण्याचा काँग्रेस आणि शरद पवारांचा डाव आहे. याचं बोलकं उदाहरण म्हणजे, उद्धव यांच्या मर्यादांवर शरद पवार यांनी “लोक माझे सांगाती” या पुस्तकात मार्मिक भाष्य केले आहे. “दोन वर्षात उद्धव ठाकरे काही तास मुख्यमंत्री कार्यालयात गेले. ही बाब आमच्या अनुभवी लोकांच्या पचनी पडणारी नव्हती” अशा शब्दात शरद पवार यांनी उद्धव यांची हजेरी घेतली आहे.

उध्दव ठाकरेंसोबत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून दगफटका
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक फायदा काँग्रेसचा झाला आहे. त्यापाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही चांगली कामगिरी केली आहे. फटका बसला आहे तो केवळ उध्दव ठाकरें यांनाच! कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी स्वतःच्या विस्तारासाठी उद्धव ठाकरे यांचा वापर करून घेतला आहे. उद्धव यांच्या बाजूची मते कॉंग्रेस राष्ट्रवादीला मिळाली पण कॉंग्रेस राष्ट्रवादीची मते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळाली नाहीत, हेच निकालावरुन दिसून येते.

मुख्यमंत्रीपदावरुन आघाडीत बिघाडी!
मुख्यमंत्री पदाची लालसा अजूनही कायम असल्याचे उध्दव ठाकरेंच्या विधानांवरुन दिसते. एकीकडे महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असला तरी किमान बंद दाराआड तरी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, अशी मागणी उध्दव ठाकरेंनी लावून धरली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव यांच्या भूमिकेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. कॉंग्रेस आणि गांधी परिवाराचे निष्ठावंत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याची परंपरा नाही, असे थेट सांगून यातील हवा काढून घेतली आहे. शरद पवार यांनीही मुख्यमंत्री पदाच्या भुमिकेवरुन उध्दव ठाकरेंना स्पष्ट इशाराच दिला आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव यांनी आपल्या पक्षातून चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर केली त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि विशाल पाटील निवडून देखील आले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पाठींबा दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी परस्पर आपले स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज भरला आणि नार्वेकर निवडून आले. शरद पवार यांच्या उमेदवाराला त्यामुळे नामुष्की पत्करावी लागली. पवार यांनी घडल्या प्रकारावर जाहीर नाराजी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने न मिळणारी सत्ता तब्बल अडीच वर्षे उपभोगली. लोकसभा निवडणुकीत उद्धव यांची मते कॉंग्रेस राष्ट्रवादीने खेचून नेली. आता विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरण करुन जास्तीच्या जागा पदरात पाडून घ्यायच्या हा कॉंग्रेसचा डाव आहे आणि त्या डावाला शरण जाण्याशिवाय उद्धव यांना अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.