जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२५ । सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचेच्या घटना सातत्याने समोर येत. यातच सध्या अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु असून मात्र अशातच जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे अकरावी प्रवेशासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या दोन शिक्षकांना शाळेतच धुळ्याच्या एलसीबीने रंगेहात अटक केली. गुलाब साळुंखे व उल्हास बागुल अशी लाचखोर शिक्षकांची नावे आहेत.

तक्रारदार हे मेहुणबारे येथील रहिवासी असुन त्यांचा मुलगा गिरणा प्रसारक मंडळाच्या मेहुणबारे माध्यमिक विद्यालयात इ.१० वी उत्तीर्ण झाला आहे. त्यास या संस्थेच्या मेहुणबारे उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी सायन्स या वर्गात प्रवेश मिळण्याबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार व त्यांचा मुलगा २७ मे रोजी शाळेत गेले. तेथे उपशिक्षक गुलाब विरभान साळुंखे व लिपिक पंजाबराव देशमुख यांची भेट घेतली.
तेव्हा त्यांनी तक्रारदाराला मुलाच्या प्रवेशासाठी २० हजार रुपये द्यावे लागतील, त्यातील १० हजार रुपये ऑनलाईन अर्ज केल्यावर व उर्वरीत १० हजार रुपये शाळेत प्रवेश घेतांना द्यावे लागतील. त्याशिवाय शाळेत प्रवेशाचे काम होणार नाही असे सांगितले. मात्र तक्रारदार यांना हे पैसे द्यावयाचे नसल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ रोजी तक्रार दिली होती.
तक्रारीची २९ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. तसेच काल शुक्रवारी ३० रोजी सापळा रचला. कारवाई दरम्यान उपशिक्षक गुलाब साळुंखे यांनी तक्रारदाराकडुन १० हजार रुपये लाचेची रक्कम शाळेच्या आवारात स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी दोघा शिक्षकांच्या विरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी व पथकाने केली.