जळगाव लाईव्ह न्यूज । पिंप्राळ्यातील एका ५९ वर्षीय व्यापाऱ्याला पोलिस असल्याचे सांगून भरदिवसा दोन भामट्यांनी सुमारे १ लाख ७२ हजारांना गंडवल्याचा प्रकार घडला. यात भामट्यांनी सोन्याची चेन, अंगठी लंपास केली आहे. संजय भगीरथ सोमाणी (वय ५९, रा. पिंप्राळा) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय सोमाणी हे बांधकाम साहित्याचा व्यवसाय करतात. २७ मे रोजी ते खरेदीसाठी जळगाव शहरात आले होते. खरेदी आटोपल्यानंतर ते दुचाकीने घरी जात असताना, दुपारी १२.३० वाजता बजरंग बोगद्यापुढे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मागून काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन व्यक्ती आले. त्यापैकी एक पोलिसांचा गणवेशात तर दुसरा साध्या वेशात होता.
पोलिसांचा गणवेश घातलेल्या व्यक्तीने सोमाणी यांना थांबवून ‘आम्ही तुम्हाला कधीपासून आवाज देत आहोत, तुम्ही का थांबत नाही?’ असे विचारले. त्यावेळी सोमाणी यांनी गाडी चालवताना मी मागे वळून बघत नाही असे सांगितले, त्यानंतर त्यांनी सोमाणी यांचे लायसेन्स तपासून पंजाब व उत्तर प्रदेशमधून लोक आले असल्याने साहेबांनी सोन्याचे दागिने न घालण्यास सांगितले आहे, असे सांगून सोमाणी यांना त्यांच्या हातातील अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन काढून रुमालात व्यवस्थित गुंडाळून ठेवण्यास सांगितले. सोमाणी यांनी सांगितल्याप्रमाणे दागिने रुमालात गुंडाळून पँटच्या डाव्या खिशात ठेवले. त्याचवेळी दोन्ही भामट्यांनी सोमाणी यांचे दागिने लंपास केले.
रुमाल उघडताच दिसले दगड
सोमाणी हे काही अंतर पुढे गेल्यानंतर सोमाणी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना घडलेला प्रकार सांगत असताना, त्यांनी खिशातील रुमाल बाहेर काढला. तेव्हा १२ ग्रॅमची सोन्याची चेन व ६ ग्रॅमची अंगठीऐवजी त्यांना दोन लहान गोल दगड दिसले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मुख्याध्यापकांसोबत घटनास्थळी धाव घेतली; परंतु तोपर्यंत दोन्ही भामटे पसार झाले होते. सोमाणी यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन संपूर्ण हकिगत सांगितली. नंतर त्यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना, विशेषतः पोलिसांच्या वेशात असलेल्या व्यक्तींकडून काही मागणी झाल्यास त्यांची खात्री करून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.