
जळगाव लाईव्ह न्यूज । यावल शहरातील अयेशा नगर परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने अवघ्या २० वर्षांच्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय. ‘माझ्या पसंतीनुसार लग्न केले नाही तर जीव देईल,’ असा हट्ट धरून ज्या तरुणीने आपल्या प्रियकराशी विवाह केला, त्याच पतीने अखेर तिचा जीव घेतलाय. या घटनेनंतर मृत विवाहितेच्या आईने पोलिस ठाण्यात टाहो फोडत आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. या प्रकरणी यावल पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
यावल शहरातील अयेशा नगर परिसरात फरदीन खान आरिफ खान आणि त्याची पत्नी मशिराबी फरदीन खान (वय २०) हे दोघे राहत होते. मंगळवारी घरात दोघेच असताना त्यांच्यात एकमेकांच्या चारित्र्यावरून संशय घेत वाद सुरू झाला. हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. दरम्यान, संतापाच्या भरात मशिराबी हिने फरदीनच्या कानशिलात लगावली. याचा राग अनावर झाल्याने फरदीनने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी फरदीन घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना उघडकीस येताच यावल शहरात एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासांतच संशयित आरोपी फरदीन खान याला ताब्यात घेतले.
आईचा पोलिस ठाण्यात आक्रोश
मृत मशिराबीची आई सफीयाबी सय्यद अक्रम (रा. सुरत, गुजरात) यांनी यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मुलीने आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करण्यासाठी हट्ट धरला होता. मात्र, ज्या व्यक्तीवर तिने जिवापाड प्रेम केले आणि ज्याच्याशी विवाह केला, त्याच व्यक्तीने तिचा जीव घेतल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात आक्रोश केला.
आईच्या फिर्यादीवरून आरोपी फरदीन खान याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर शोकाकुल वातावरणात यावल येथेच मशिराबीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद करीत आहेत.





