जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यामुळे वाहनधारकही धास्तावले आहे. याच दरम्यान अंगणातून चोरून नेलेली ३५ हजार रुपयांची हिरो कंपनीची मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी हस्तगत करत दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अभय प्रवीण पाटील आणि मयूर तुळशीदास देवरे (रा. खडकी, ता. मालेगाव, जि. नाशिक) असं अटक केलेल्या दोघा चोरट्यांचे नाव आहे.

काय आहे घटना?
पारोळा तालुक्यातील कोळपिंपरी येथून ज्ञानेश्वर मच्छिंद्र कोळी यांच्या घरासमोर उभी असलेली हिरो कंपनीची मोटारसायकल (क्रमांक MH 54 A 2195) अज्ञात चोरट्यांनी २१ जुलै २०२५ रोजी रात्री ११ वाजेनंतर लंपास केली होती. त्यांनी तात्काळ पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आणि तपास पोलीस हवालदार सुनील हटकर यांच्या कडे सोपवण्यात आला.

तपासादरम्यान गावातील अभय प्रवीण पाटील आणि त्याचा साथीदार मयूर देवरे यांनी ही चोरी केल्याची शक्यता होती. त्यानुसार पोलिसांनी अमळनेर शहरात सापळा लावला. आरोपी अभय पाटील हा अमळनेरमध्ये लपून बसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून त्याचा मोबाईल क्रमांक शोधून त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, मोटारसायकल त्याच्या साथीदार मयूर तुळशीदास देवरे (रा. खडकी, ता. मालेगाव, जि. नाशिक) याच्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने मालेगाव येथे धाड टाकून मयूर देवरेलाही अटक केली.
दोघा आरोपींनी चौकशीदरम्यान चोरीची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून ३५ हजार रुपये किमतीची हिरो मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्हा उघडकीस आणण्यात आलेल्या या कारवाईमुळे पारोळा पोलिसांची प्रशंसा होत आहे.










