जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२६ । पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची थरारक घटना समोर आली आहे. चालत्या ट्रकचा टायर फुटल्याने लागलेल्या या आगीत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने चालक आणि क्लीनर यांनी प्रसंगावधान राखत वेळीच ट्रकमधून उड्या मारल्याने मोठी जीवितहानी टळली या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित ट्रक गुजरात येथून रिफाइंड तेल, ऑइल पावडर आणि अन्य साहित्य घेऊन हैदराबादच्या दिशेने निघाला होता. प्रवासादरम्यान अचानक टायर फुटल्यानंतर ट्रकमधून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.

ट्रकमध्ये चालक आणि क्लीनर उपस्थित होते. मात्र, प्रसंगावधान राखत दोघांनीही वेळीच ट्रकमधून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले. या घटनेनंतर काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी टायर फुटल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, या संदर्भात ट्रक चालक गौतम कुमार यांनी घटनेची माहिती दिली आहे.








