एसटीच्या भाडेवाढीबाबत परिवहन मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य; ऐकलंत का काय म्हणाले?

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२५ । राज्यात शनिवार २५ जानेवारीपासून एसटी (ST) बसचा प्रवास महाग झाला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाऱ्या बैठकीमध्ये १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यात आली असून एसटीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता सर्वसामान्यांना प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. ऐवढी मोठी दरवाढ केल्यामुळे प्रवासी नाराज झाले आहेत. अशातच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एसटीच्या भाडेवाढीबाबत मोठं विधान केले आहे.
काय म्हणाले प्रताप सरनाईक?
‘एसटी भाडेवाढीची मला कल्पनाच नव्हती.’, असं सांगत परिवहन मंत्र्यांनी हात वर केले आहेत. प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.धाराशिवमध्ये माध्यमांशी संवाद साधताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी भाडेवाढीवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, ‘एसटी भाडेवाढ एकत्रितपणे केली ती प्रशासनातील काही लोकांच्या चुकीमुळे झाली आहे. मलाही भाडेवाढीची कल्पना नव्हती. हा निर्णय प्राधिकरण घेते. मलाही दुसर्या दिवशी कळाले. मला ही याचे आश्चर्य वाटले.’
एसटी भाडेवाढीवर परिवहन मंत्र्यांनी आता हात वर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. तसंच, ‘मी अधिकाऱ्यांनाही विचारलं एवढी मोठी दरवाढ होते आपल्याला काहीच माहिती नाही. एखादी संस्था चालवायची म्हटल्यावर असे निर्णय घ्यावेच लागतात. यापुढे दरवर्षी ठराविक पद्धतीने कमी वाढ केली जाईल.’ असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.