⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

आपल्या मनात मशाल, आपण एकनिष्ठ : महापौर जयश्री महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२२ । आपल्या मनात मशाल आहे आणि आपण एकनिष्ठ आहोत, असे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले. तसेच संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आपली शिवसेना वाटचाल करत आहे आणि ती करतच राहील, असा मला विश्वास आहे असेही त्या म्हणाल्या.

जळगाव तालुका व धरणगाव तालुका युवासेना व शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातील वल्लभभाई पटेल भवन येथे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे. शिवतीर्थावर झालेले सभा ही अभूतपूर्व होती येथे बोलवलेली गर्दी ही काही पैसे देऊन बोलवलेली नव्हती यामुळे एकनिष्ठ आपल्या बरोबर आहे, आपल्या मनात मशाल आहे. ज्या प्रकारे काही लोक आपल्याला सोडून गेलेत, मात्र जितके सोडून गेले त्याहून अधिक लोक आपल्या बरोबर आलेत नवीन जोडले गेलेत, यामुळे शिवसेना आता यापुढे वाढतच राहणार आहे.

याचबरोबर अंधेरी पोटनिवडणुकीबाबद त्या म्हणाल्या की, येणारी निवडणूक आपण जिंकणार आहोत, शिवसेनेला पहिला आमदार हा मशाल या चिन्हावरच मिळाला होता, यामुळे आता आपलाच विजय होणार आहे, आपल्या मनात निष्ठेची मशाल आहे असेही यावेळी त्या म्हणाल्या.

बैठकीत जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जळगाव शहर महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हा समन्वयक गजानन मालपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर तीनशे ते साडेतीनशे पदाधिकारी देखील उपस्थित होते.