जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२५ । देशात आजपासून नवीन जीएसटी दर लागू झाले असून ज्यामुळे बहुतांश वस्तू स्वस्त झाले. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे आज सराफ बाजारात सोन्यासह चांदी दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोने महागले आहे. तर चांदीत वाढ झाली असून चांदीने नवीन ऐतिहासिक दर गाठला आहे. ज्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मागच्या काही दिवसापासून दोन्ही धातूंच दर सातत्याने वाढताना दिसत असून त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. अशामध्ये आजही दोन्ही धातूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोमवारी सोने दरात प्रति तोळा ४३० रुपयांची वाढ झाली आहे. तर १ किलो चांदी तब्बल ३००० रुपयांनी महागली.

काय आहे सोन्याचा नवीन दर?
सोन्याच्या २४, २२ आणि १८ कॅरेटच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. आज तुम्हाला १० ग्रॅम २४ कॅरेट सोने खरेदीसाठी १,१२,५८० रुपये मोजावे लागणार आहेत. तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,०३,२०० रुपये मोजावे लागणार आहेत. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३३० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८४,४४० रुपये मोजावे लागणार आहे.
चांदीचा नवीन दर
आज चांदी दरात तब्बल ३००० रुपयाची वाढ झाली आहे ज्यामुळे आता एक किलो चांदी खरेदीसाठी तुम्हाला १,३८,००० रुपये खर्च करावे लागतील. आतापर्यंत चांदी दरात एवढी वाढ नोंदवण्यात आली नव्हती. चांदीचा तोरा पाहुन ग्राहकांसह व्यावसायिक चांगलेच चक्रावले.
दरम्यान, अमेरिकेने जगभर अनेक देशावर लावलेल्या टेरीफनंतर आता अमेरिकन फेडरल बँकेने त्यांच्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून, सोन्याच्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदार वळल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणजे सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान दसरा, दिवाळी आणि आगामी लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याची किंमत कमी होण्याची आशा बाळगून असलेल्या ग्राहकांसह व्यावसायिकांची त्यामुळे निराशा झाली.









