जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२५ । सोने आणि चांदी दरात सुरु असलेली दरवाढ काही थांबताना दिसत नसून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ दिसून आलीय. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ९२० रुपयांनी वाढ झाली तर दुसरीकडे चांदी दरात तब्बल १ हजार रुपयाची वाढ झाली. यामुळे चांदीचे दीड लाखाचा टप्पा गाठला आहे. आज तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदीला जाणार असाल तर त्यापूर्वी तपासून घ्या नवीन दर..

खरंतर मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात सातत्याने वाढ दिसून आली. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि बदलत्या घडामोडीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंनी ऐतिहासिक पातळी गाठली आहे. या आठवड्यात २ ऑक्टोबर रोजी दसरा सण आहे. दसऱ्याला अनेक जण सोने किंवा चांदी खरेदीला महत्व देतात. मात्र दसऱ्यापूर्वी सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झालीय.

सोन्याचा नवीन दर काय?
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये ९२० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,१६,४०० रुपये मोजावे लागणार आहे. तर आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,०६,७०० रुपये मोजावे लागणार आहे.
चांदीचा दर
आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. १ किलो चांदीच्या दरामध्ये १००० रुपयांनी वाढ झाली आहे. हीचांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,५०,००० रुपये खर्च करावे लागतील.
सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.दरम्यान, गेल्या वर्षभरात सोन्याचा भाव तब्बल 52 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी सोन्यात गुंतवणूक करणारे चांगलेच मालामाल झाले आहेत. आगामी काळातही सोन्याचा भाव असाच वाढण्याची शक्यता वर्षाअखेर तो दीड लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.









