जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून याचदरम्यान, भुसावळ शहरातील एका घरफोडी प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत भुसावळ शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईमुळे पोलिसांच्या तपासकौशल्याचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी शहरातील मुख्याध्यापकांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोकड व दागिन्यांवर हात साफ केला होता. घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान रेल्वे स्थानक परिसरातून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शौकत रफीक शहा (वय ४६, रा. भुसावळ), शौला उर्फ बिरेंद्र सुरेंद्र परमान (वय ४०, रा. बिहार) आणि जसवीरमित्र राज (वय ४२, रा. हरियाणा) यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल बाडगे, हवालदार गोपाल गणे, आकाश पाटील, विकास सातव, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आदींच्या पथकाने केली.









