⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आजपासून जळगाव आगारातून ‘या’ तीन मार्गावर लालपरी धावणार !

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. संपाच्या पंधराव्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी आपली मागणी कायम ठेवली आहे. नियोजन पूर्ण न झाल्याने शनिवारी जळगाव आगारातून बसेस सोडण्यात आल्या नाहीत. मात्र, दीड वर्षांपूर्वीच्या पदभरतीतील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन रविवारपासून जळगाव आगारातून धुळे, अमळनेर, चोपडा मार्गावर लालपरी धावणार आहे.

आगार प्रशासनाच्या नियाेजनानुसार धुळे, अमळनेर, चाेपडा या तिन्ही मार्गासाठी सकाळी १० वाजता तीन बसेस साेडण्यात येणार आहेत. त्यानंतर दर अडीच तासांनी बस साेडली जाणार आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम असून जळगाव विभागातील पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

एसटीचा संप सुरू असल्यानं अनेक प्रवाशी खासगी वाहनांचा पर्याय अवलंबत आहेत. मात्र हे खासगी वाहतूकदार प्रवाश्यांकडून अव्वाच्या- सव्वा भाडे आकारात प्रवाश्यांची लूट करताना दिसून येत आहे.  दरम्यान, पदभरतीतील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून आजपासून जळगाव आगारातून धुळे, अमळनेर, चोपडा मार्गावर लालपरी धावणार आहे.

नवीन भरतीतील प्रशिक्षित ४० कर्मचाऱ्यांना (चालक-वाहक) शनिवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांना रविवारपासून कामावर हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. या नियुक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत संपकरी कर्मचाऱ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हरकत घेतली. त्यांना दहा दिवसांचे प्रशिक्षण दिल्यावरच बसचा ताबा देण्याची मागणी केली आहे. विभागातील काही कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शविली आहे. सुरुवातीस नवीन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बससेवा सुरू करून हळूहळू अन्य कर्मचारी यात सहभागी होतील, असा विश्वास संघटना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, दुसरीकडे सपंकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे चित्र आहे.