जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढताना दिसत आहे. यामुळे नागरिक धास्तावले आहे. दरम्यान अशातच धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आलीय. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण प्रल्हाद विसपुते (वय ४५) या आपल्या कुटुंबासह नाशिक येथे विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी ७ मार्चच्या रात्री ते ८ मार्चच्या सकाळीदरम्यान घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉकर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात चोरट्यांनी कपाटातील ७ ग्रॅमची सोन्याची माळ (२१ हजार रुपये), १० ग्रॅमची सोन्याची चैन (३० हजार रुपये), ३० ग्रॅमचा ‘राणीहार’ (९० हजार रुपये), १० ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस (३० हजार रुपये), ८ ग्रॅमचे झुमके (२४ हजार रुपये) आणि १० ग्रॅमची ठुसी (३० हजार रुपये) असे दागिने तसेच ५०० रुपयांच्या नोटांमधील ४५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
८ मार्च रोजी सकाळी विसपुते कुटुंब घरी परतल्यानंतर घरातील कुलूप तुटलेले आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत असून चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.










