जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । एरंडोल येथे नागोबा मढी परिसरात संजय विठ्ठल महाजन यांचा थोरला मुलगा भावेश याच्या विवाहानिमित्त घरात जवळपास महिनाभरापासून आनंद ओसंडून वाहत होता. आठवड्याभरापूर्वी भावेश (वय २५) याचा साखरपुडा होऊन येत्या २५ एप्रिल रोजी त्याचा विवाह सोहळा पार पडणार होता. विवाहानिमित्त लगीन घाई सर्वत्र सुरू होती. रोज रात्री महिलावर्ग लग्नानिमित्त गाणी म्हणत होते. या वातावरणात अचानक बदल होईल व काहीतरी भलतंच घडेल अशी स्वप्नातही कोणाला कल्पना नव्हती पण नियतीने असा खेळ मांडला की, अवघ्या पाच दिवसांवर लग्न असताना भावेश शेतातील विहिरीत पाण्यात पडल्याने त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना २० एप्रिल रोजी आढळून आला. एखाद्या चित्रपटातील कथानकात जसा क्लायमेक्स पहावयास मिळतो तसा प्रकार भावेश च्या मृत्युने त्याच्या लग्न घरी आढळून आला. या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
भावेश हा दुचाकी घेऊन गेला होता परंतु तो लवकर परत न आल्याने त्याची चौकशी केली असता, सुनील पाटील यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे फोन वरून कळविण्यात आले. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली लोकांच्या मदतीने भावेश चा मृतदेह बाहेर काढण्यात येऊन खाजगी वाहनाने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यावेळी त्याच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान भावेश च्या लग्नामुळे घरी असलेल्या आनंदी वातावरणाचे रूपांतर शोककळा व आक्रोश झाले. हळद लागण्याच्या आधी भावेशचा मृत्यू झाला. बोहल्यावर चढण्याच्या आधी या नवरदेवाची जीवन यात्रा संपली. लग्नाची वरात निघण्याऐवजी अंत्ययात्रा निघाली आणि आनंदाच्या जागी सर्व नातेवाईकांचे व मित्र परिवाराचे दुःख व शोक अनावर झाला. लग्न पाच दिवसावर आले असतांना भावेश ने आत्महत्या का केली असावी ? त्याचा अचानक तोल जाऊन तो पाण्यात बुडून त्याचा मृत्यू तर झाला नाही ना ? की आणखी काही वेगळ्या कारणास्तव त्याला आपली जीवन यात्रा संपवावी लागली ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याशिवाय भावी जीवनाची गोड स्वप्ने रंगवणारी वधू लग्न विधी पार पडण्याच्या आधीच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्न सोहळ्याला उपस्थिती देण्यासाठी प्रतीक्षा करणारे पाहुणे आता नि:शब्द होऊन भावेश च्या अंत्ययात्रेत सामील झाले.