⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

वानराच्या मृत्यूनंतर चारशे ग्रामस्थांनी केलं मुंडण ; गावात पाळला पाच दिवस दुखवटा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२३ । एरंडोल तालुक्यातील भालगाव येथे विजेचा धक्का बसून वानराचा मृत्यू झाला होता. यानंतर वानराचे धार्मिक पद्धतीने उत्तरकार्य करून लोकवर्गणीतून सुमारे तीन हजार नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच चारशे ग्रामस्थांनी मुंडण करून गावात पाच दिवस दुखवटा पाळण्यात आला.

भालगाव येथे ८ नोव्हेंबरला सकाळी गावातील श्री विठ्ठल मंदिराजवळ विजेचा धक्का लागून वानराचा मृत्यू झाला.यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन वानरावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन केले. गावातून वाजतगाजत वानराची अंत्ययात्रा काढण्यात आली.यामध्ये स्थानिक भजनीमंडळाचे सदस्य देखील सहभागी झाले होते.

अंत्ययात्रेत सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते. दिवाळीपूर्वी वानराचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. दिवाळीत गावात रोषणाई करण्यात आली नाही अथवा फटाके फोडण्यात आले नाहीत.पाच दिवस दुखवटा पाळल्यानंतर रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वानराचे धार्मिक आणि विधिवत विधी करून उत्तरकार्य करण्यात आले. सुमारे चारशे ग्रामस्थांनी सामूहिक मुंडण करून वानरास श्रद्धांजली वाहिली. यामध्ये युवक व शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. उत्तरकार्याच्या दिवशी भालगावसह तरखेडे, बोरगाव, नंदगाव यासह परिसरातील सुमारे तीन हजार नागरिकांना अन्नदान करण्यात आले.