⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

खड्डे चुकवताना तोल गेल्याने दुचाकीस्वार पडला गिरणा नदी पात्रात

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । ऋषिपांथा पुलावरून जाताना समोरून ट्रक येत असल्याने खड्डे चुकवण्याच्या नादात लग्न लाऊन परतणारा एक दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि ताे आपल्या दुचाकीसह पुलाखाली नदीपात्रात पाण्यात पडला. यात दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने नदीला पाणी असल्यामुळे जीवितहानी झाली नाही.

बहाळ येथील गिरणा नदीवर असलेला ऋषीपांथा-बहाळ पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सप्टेंबर महिन्यात मन्याड धरणक्षेत्रात ढगफुटी झाल्याने मन्याड व गिरणा नदीला महापूर आला होता. त्यात पाण्याचा प्रवाहाचा वेग जादा असल्याने २०२० या वर्षी बनवलेले कठडे, पुलावरील नवीन केलेले ओतीव-काम वाहून गेले होते. मात्र, त्यानंतर ऋषिपांथा पुलाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवाशी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. दरम्यान, पुलाची अवस्था बिकट असून पुलाच्या दोन्ही बाजुला संरक्षक कठडे नाहीत, पथदिवे नाहीत. त्यामुळे रात्री अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन पुल ओलांडावा लागताे. या मार्गाने जड वाहतूक वाढल्याने पुलावर खड्डे पडणे, काँक्रीट उखडणे आणि लोखंडी सळई बाहेर पडणे नित्याचे झाले आहे. दरम्यान, आज घडलेल्या अपघातामुळे तत्काळ नवीन पुल करावा, अशी मागणी हाेत आहे. दरम्यान खासदार सीआरएफ फंडातून २० कोटींचा नवीन पुल बनवण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. नवीन पुलाला मार्च अखेरपर्यंत मंजुरी मिळेल, असे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.

महाशिवरात्रीला हजाराे भाविकांकडून हाेणार या धाेकादायक पुलाचा वापर; अपघाताचा धाेका

महाशिवरात्री यात्रेनिमित्त ऋषिपांथा येथे कीर्तन सप्ताह सुरू आहे. कीर्तन, भजनासाठी पंचक्रोशीतील अनेक वृद्ध, नागरिक, वारकरी, ग्रामस्थ रात्री या पुलावरून ये-जा करत असतात. त्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, १ मार्चला महाशिवरात्र असल्यामुळे हजारो भाविक महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. अशा प्रसंगी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.