⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

राज्यस्तरीय युवा संसद आयोजनाचा मान नेहरू युवा केंद्र जळगावला

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित केला जाणारा तिसरा राष्ट्रीय युवा संसद उत्सव २०२१-२२ मार्चमध्ये होणार आहे. जळगाव नेहरू युवा केंद्राचे कार्य लक्षात घेता यंदाचा राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रम आयोजित करण्याचा मान जळगाव केंद्राला देण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी आयएमआर महाविद्यालयातून ऑनलाईन पद्धतीने युवा संसद स्पर्धा घेतली जाणार आहे.

युवांच्या नेतृत्व आणि वक्तृत्व गुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्रातर्फे युवा संसद उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाचा राष्ट्रीय उत्सव पुढील महिन्यात पार पडणार आहे. राष्ट्रीयस्तरावर विजयी होणाऱ्या स्पर्धकांना २ लाख, १.५ लाख आणि १ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य आणि गोवा राज्याची जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा सध्या सुरू आहे. जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये विजयी स्पर्धकांना राज्यस्तरीय युवा संसदेत प्रवेश मिळणार आहे.

जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धेसाठी इंक्रेडीबल इंडिया, आयुष्यमान भारत, बेटी बचाव, बेटी पढाव, स्किल इंडिया, डिजीटल इंडिया, स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या विषयावर ४ मिनिटात आपले वक्तृत्व सादर करायचे आहे. प्रत्येक जिल्ह्यातील विजयी स्पर्धक २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान यंदा जळगाव नेहरू केंद्राला मिळाला आहे.

आयएमआर महाविद्यालयात पार पडणाऱ्या राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धेत राज्यभरातील खासदार, आमदार देखील ऑनलाईन पध्दतीने सहभागी होणार आहे. नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र, गोवा राज्याचे संचालक प्रकाशकुमार मनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नेहरू युवा केंद्र जळगावचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी दिली आहे.