शनिवार, डिसेंबर 2, 2023

जिल्ह्यात शिवसेना फुटीचा इतर पक्षांनाच होणार फायदा !

जळगाव लाईव्ह न्यूज | 21 जून 2023 | महाराष्ट्रातलं सर्वात मोठा राजकीय उठाव होऊन वर्ष पूर्ण होत आहे. अशावेळी शिवसेनेची ताकद विभागली गेली असल्यामुळे याचा फायदा येत्या काळात इतर पक्षांना होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले होते. यामुळे शिवसेना पक्ष संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या ताकदीने वाढेल असे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र वर्षभरापूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे शिवसेनेची ताकद विभागली गेली आणि याचा फायदा इतर पक्ष उचलतील असे चित्र सध्या दिसून येत आहे.

वर्षभरावर विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका उभ्या राहिल्या आहेत. यामुळे शिवसेनेची विभागलेली ताकद भारतीय जनता पक्ष आणी राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या चांगलीच कामी येणार आहे.

याचं एक मोठं उदाहरण म्हणजे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र हे पारंपारिक एकनाथराव खडसे यांच्याच नावाने ओळखलं जायचं. मात्र अपक्षपणे पण शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून उभे राहिलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथराव खडसे यांच्या मुलीचा म्हणजेच रोहिणी खडसे यांचा पराभव केला. शिवसेनेने त्यांना संपूर्ण ताकदीने मदत केली. मात्र आता चंद्रकांत पाटील हे शिंदेंसोबत गेले असल्यामुळे ठाकरे गट त्यांच्या विरोधात उभा राहिला असून संबंधित जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

याचबरोबर जळगाव ग्रामीण जो गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ आहे. जो शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. तो येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस घेईल असेही म्हटले जात आहे. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर हे उभे राहतील असेही म्हटले जात आहे. यामुळे शिवसेनेतचा अर्धा गट हा गुलाबराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करेल आणि शिवसेनेच्या फुटीमुळे याचा फायदा थेट राष्ट्रवादी काँग्रेसला होईल.

पारोळा मतदार संघ ज्या ठिकाणी चिमणराव पाटील यांनी सतीश पाटील यांचा पराभव केला अशावेळी चिमणराव पाटील यांच्या विरोधात एखाद वेळेस सतीश पाटील यांना तिकीट मिळू शकतं आणि शिवसेनेला शिवसेनेच्या विरोधातच प्रचार करावा लागू शकतो.

तर दुसरीकडे जेव्हा शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले आणि शिवसेनेत कोणत्याही प्रकारची फूट पडली नव्हती त्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्लात आपलं स्थान निर्माण करायचं असं म्हणत होती. मात्र आता शिवसेनेचा एक गट हा भारतीय जनता पक्षाबरोबर जात लढतोय. तर दुसरा गट हा भारतीय जनता पक्षासोबत जाऊन युती करत लढत आहे. अशावेळी भारतीय जनता पक्षाशी लढताना देखील शिवसेनेची ताकद ही अपुरी पडणार आहे.

सरते शेवटी इतकच की महाराष्ट्रात झालेलं बंड हे जिल्ह्यामध्ये शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार असून येत्या काळात त्याचा फटका शिवसेनेलाच बसेल.