मंगळवार, सप्टेंबर 12, 2023

IMD Alert : राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी पुढचे तीन-चार तास महत्त्वाचे

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२३ । गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती. त्यामुळे सर्वजण पाण्याची चातकासारखी वाट पाहत होती. अखेर सर्वांची हाक पावसाने ऐकली आणि गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावासाने हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

नेमका अलर्ट काय?

हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांच्या नागरिकांना पुढच्या तीन ते चार तासांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे या सहा जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये पुढच्या तीन ते चार तासांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचं पुनरागमन झालंय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पोहोचला नसला तरी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुणे या सहा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या सहा जिल्ह्यांसाठी पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत. या जिल्ह्यांमधील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात हवा तसा पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत पडले होते. याशिवाय धरणांमधील पाणीसाठा देखील संपत आल्याने चिंता वाढली होती. पाऊस पडला नाही तर भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटाला सामोरं जावं लागेल, अशी भीती वर्तवली जात होती. अशातच राज्यात पावसाने पुन्हा एंट्री मारली असून काही जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगलाच मुसळधार कोसळतोय. पण त्याचं हे कोसळणं जरुरुीचं आहे. कारण अजूनही हवा तितक्या स्वरुपात पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुरेशा पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.