जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२४ । जळगाव जिल्हयात कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ज्वारी पिकाचे शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्या बाबत आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला.
यावेळी ते म्हणाले जळगाव जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारी पिकाचे शासकीय हमी भाव केंद्र सुरू नसल्याने सदर केंद्रा अभावी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांचे हमी भाव केंद्र नसल्याने होत असलेले नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारी पिकाचे हमीभाव केंद्र सुरू करण्या बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली अथवा करण्यात येत आहे. लवकरात लवकर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारी हमी भाव केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली.
या प्रश्नाला अन्न व नागरी पुरवठा ,ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर देताना सांगितले, जळगाव जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारी पिकाचे शासकीय हमी भाव केंद्र सुरू नसल्याने सदर केंद्रा अभावी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे अंशतः खरे आहे .राज्य शासनाने दि १५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनास सादर केलेल्या ज्वारी खरेदीच्या आराखड्यास केंद्र शासनाकडून दि २७ एप्रिल २०२४ च्या पत्रान्वये मंजुरी प्राप्त झाली आहे.
केंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्या नंतर राज्य शासनाने ९ मे २०२४ च्या पत्रान्वये अभिकर्ता संस्थांना ज्वारी खरेदीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्या करता उद्दिष्टे विभागून दिली आहेत त्यानुसार जळगाव जिल्ह्यात १८ खरेदी केंद्रावर एकूण ३४९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आज अखेर एकूण १३५५० क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आलेली आहे. आणखी मागणी असल्यास माहिती घेऊन खरेदी केंद्र सुरू करण्या बाबत कार्यवाही करण्यात येईल असे छगन भुजबळ यांनी सांगितले.