जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । “वंशाचा दिवा नसला तरी काय फरक पडतोय” या सामाजिक दृष्ट्या बांधिलकी असलेल्या परंपरेला छेद देऊन सावित्रीच्या लेकींनी बापाला अग्नीडाग दिल्याने, गावात व परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
वडगाव कडे ता. पाचोरा येथील छगन हरी मोटे यांना वंशाचा दिवा म्हणून मुलगा नाही. मात्र तीन मुली आहेत. मोठी मुलगी कौशल्याबाई भानुदास डांबरे, दुसरी सुनंदाबाई धोंडु गायकवाड, तीसरी रेखाबाई काळे ह्या तीन मुली आहेत. दोन्ही मुली सातगाव डोंगरी येथे राहात असल्याने छगन हरी मोटे दोन नंबरची मुलगी सुनंदाबाई यांच्याकडे राहात होते.
आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी अनेक ठिकाणी मुलांकडून हेळसांड होताना आपणास निदर्शनास येते. मात्र मुलींच्या बाबतीत तसे घडतांना दिसत नाही. म्हणूनच की काय छगन हरी मोटे यांचा उतारवयात सुनंदाबाई यांनी बापाचा आनंदात संभाळ केला. मोठी मुलगी कौशल्याबाई आपल्या वडिलांची देखभाल करण्यासाठी येत असत. सुनंदाबाई यांच्या आईचे निधन यापूर्वीच झाले असल्याने मोटे यांना तिन्ही मुलींचा एकमेव आधार होता. वडिलांना अग्नीडाग कोणी द्यावा म्हणून तिन्ही मुलींनी विचार करून, वंशाचा दिवा आपण तिन्ही समजून, आपणच आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार आपल्या हातून करू. असा निर्णय घेतला.
मोठी मुलगी कौशल्याबाई हीने वडिलांच्या मुखात पाण्याचे थेंब टाकून वडिलांना अग्नीडाग दिला. यावेळी अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित असलेले नातेवाईक मंडळींचे डोळे पाणावले होते. यावेळी वेळी अनेकांच्या तोंडून सावित्रीच्या लेकींनी आपले कर्तव्य पार पाडले. असे शब्द ऐकावयास मिळाले.