जळगाव लाईव्ह न्यूज | ७ डिसेंबर २०२२ | श्री दत्त जयंती आज सर्वत्र मोठ्या भक्तभावाने साजरी केली जात आहे. गिरनार पर्वत, श्रीक्षेत्र माहूर, पीठापूर, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, औदुंबर ही स्थाने तर दत्तसंप्रदायासाठी तीर्थक्षेत्रेच आहेत. या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी नेहेमीच गर्दी असते. मात्र महाराष्ट्रात आणि इतरत्रही काही वैशिष्टेपूर्ण दत्तस्थानेसुद्धा आहेत आणि प्रत्येकाचे स्वतंत्र असे वैशिष्ट देखील आहे. यापैकी एक म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील पातोंडा (ता.अमळनेर) येथील श्री दत्त मंदिर. स्वातंत्र्यपूर्व काळात १९४० मध्ये कोरीव लागडी मंदिरात श्री दत्त मूर्तीची स्थापना करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे, गावोगावी नाटकांचे प्रयोग करून आलेल्या मिळकतीतून नाट्यकर्मींनी स्वतःच्या हाताने हे मंदिर उभारले आहे.
अमळनेर तालुक्याला ऐतिहासिक असे महत्त्व आहे. याचेच एक सुवर्णपान म्हणजे नाट्यकर्मींनी पातोंडा येथे उभारलेलं श्री दत्त मंदिर. गावातील ज्येष्ठ नागरिक सांगातात की, एकेकाळी गावाच्या बाहेर गाव दरवाजा होता. तिथे श्री मारोती मंदिर व गणपती मंदिर होते. तिथे त्या काळात गावाच्याच एका छत्रपती शिवाजी नाटक मंडळ या ऐतिहासिक नाटक कंपनीने दुमजली असे लाकडी श्री दत्त प्रभूंचे मंदिर बांधले. हे मंदिर १९४० ला गावातील तत्कालीन तरुण नाट्यकर्मींनी प्रपंच सांभाळत रात्रीच्या वेळी गावोगावी नाटकांचे प्रयोग करून आलेल्या मिळकतीतून हे मंदिर उभारले होते.
या मंदिरात कोणाच्या नावाची पाटी नाही किंवा त्यांच्या नावाचा उल्लेख नसला तरी अमळनेरकरांच्या मनात त्या सर्वांचे नाव कोरले गेलं आहे. या मंदिरात स्वयंभू श्री दत्त प्रभूंची मूर्ती व श्री गणपती मूर्ती आहेत. ऐकेकाळी शहराच्या वैभवात भर घालणार्या या मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचा निर्णय गावातील श्री दक्षिणीमुखी हनुमान मंडळ, श्री दत्त भजनी मंडळ व दत्त विश्वस्थ मंडळ यांनी घेतला आहे. त्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येवून काम देखील सुरु केले आहे. या कामात अनेकांचा हातभार लागत आहे. लवकरच या मंदिराचा जिर्णोेध्दार पूर्ण होवून मंदिर भाविकांसाठी खुले होईल.
महाराष्ट्रातील काही वैशिष्टेपूर्ण श्री दत्तस्थाने
नाथसंप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या चारही संप्रदायांत श्री दत्तात्रेयांविषयी प्रचंड श्रद्धा आहे. श्री दत्तात्रेय हे जरी महाराष्ट्रातील भक्तप्रिय दैवत असले तरी श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे त्याच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली. त्यानंतर औदुंबर, नरसोबा वाडी व गाणगापूर ही या संप्रदायाची प्रमुख तीर्थस्नाने बनली. गिरनार पर्वत, श्रीक्षेत्र माहूर, पीठापूर, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, औदुंबर ही स्थाने तर दत्तसंप्रदायासाठी तीर्थक्षेत्रेच आहेत. या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी नेहेमीच गर्दी असते. मात्र महाराष्ट्रात आणि इतरत्रही काही वैशिष्टेपूर्ण दत्तस्थानेसुद्धा आहेत. यामध्ये माणिकनगर, गरुडेश्वर, कडगंची, मुरगोड, कारंजा, माणगाव, बाळेकुंद्री, बसवकल्याण, नारेश्वर, अमरापूर, कुडुत्री, शंकरमहाराज समाधी मंदिर, पैजारवाडी, लाडचिंचोळी, तिलकवाडा, अनसूया, झिरी, शिरोळ, लातूर, मंथनगुडी, भाटगाव, भालोद अशा ठिकाणांचाही समावेश आहे.