ढगाळ वातावरणाने दिलासा, मात्र उकाडा जाणवणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । जळगावात मागील एकही दिवसापासून ४० अंशावर राहणारे तापमान काल वाढून ४१ अंशावर गेलं होत. २ ते ५ जून दरम्यान उत्तर महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली असून त्यामुळे क्युमुलस ढग जिल्ह्यात सर्वदूर पसरले आहेत. ढगाळ वातावरण असले तरी काल उकाडा काहीसा जाणवत होता. दरम्यान, आज देखील तापमानाचा पारा ४१ अंशांवर राहण्याची शक्यता आहे.

यंदा मान्सून केरळात वेळेआधीच दाखल झाला आहे. यानंतर राज्यातील अनेक भागात पूर्वमाेसमी पाऊस कोसळत आहे. तर काही दिवसापासून पूर्वमोसमी वाऱ्यामुळे जळगावातील पारा घसरला आहे. गेल्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच जळगावात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक होरपळून निघाले होते. त्यावेळी उन्हाचा पारा ४५ ते ४६ अंशावर गेला होता.सकाळी १० वाजेपासूनच तापमानाचा पारा ४० अंशावर जात होता. त्यामुळे असह्य उकाडा जाणवत होता.

मात्र गेल्या काही दिवसापासून पूर्वमोसमी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. मात्र सध्या पूर्वमोसमी पावसासाठी क्युमुलस ढगांची उत्तर महाराष्ट्रात गर्दी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.तर सध्या तापमानाचा पारा एका अंशाने वाढला आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
११ वाजेला – ३७ अंश
१२ वाजेला – ३८ अंश
१ वाजेला- ३९ अंशापुढे
२ वाजेला – ४१ अंश
३ वाजेला – ४१ अंशापुढे
४ वाजेला – ४१ अंश
५ वाजेला – ४० अंश
६ वाजेला – ३८ अंश
७ वाजेला – ३७ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३६ तर रात्री ९ वाजेला ३५ अंशावर स्थिरावणार.