उद्धव ठाकरेंची आणखी एका बंडखोर आमदारावर कारवाई, पदावरून केली हकालपट्टी
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । बंडखोर आमदार तानाजी सावंतांना शिवसेनेचे मोठा धक्का दिला असून त्यांची सोलापूरच्या जिल्हा संपर्क पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्यांच्या (tanaji sawant) जागी आता सोलापूर जिल्हा संपर्क पदावर अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तानाजी सावंत (tanaji sawant) यांची हकालपट्टी आणि अनिल कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं करण्यात आल्याची माहिती सामनातून देण्यात आली आहे. तानाजी सावंत (tanaji sawant) यांना शिवसेनेचा हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड केल्यामुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली. ती अजूनही सुरूच आहे. त्यातच आता शिवसेनेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसैनिकांना तानाजी सावंत यांच्या पुणे आणि सोलापूरमधील कार्यालयांची तोडफोड केली होती. त्यानंतर तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांना इशारा दिला होता. आता मात्र त्यांच्यावर थेट पक्षप्रमुखांनीच कारवाईचा बडगा उगारला आहे.
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला जाणार आहे. यावेळी निकाल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागल्यास शिवसेनेची (Shivsena) अडचण होऊ शकते.
आमदारांनंतर खासदारांची गळती
दरम्यान, शिवसेना खासदार संजय जाधवांनी महापुजेला हजेरी लावल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंदिरात संजय जाधवांचा सत्कार केला. शिवसेनेत आमदारांपाठोपाठ आता खासदारांचही बंड होणार असल्याचे चिन्हे दिसत आहे. त्यामुळे आता शिवसेनेची गळती रोखण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतात का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे, खासदार भावना गवळी हे एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले होते.