जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२४ । नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार असून यानिमित्त काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात सभा घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. विशेष पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ त्यांनी ट्विटवर शेअर केला आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे कि, महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठे आहे निवडणूक आयोग?, असा आरोप त्यांनी केला आहे.
याबाबत सुषमा अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, “जळगावात दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. ही सभा झाल्यानंतर सभेला उपस्थित असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना पैसे वाटत असतानाचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. सकाळपासून शिंदे गटाचे नेते सांगत आहेत की, असे काही घडले नाही. सभेला उपस्थित असणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी हे व्हिडिओ काढले आहेत. याबाबत आणखी व्हिडिओ आहेत आणि मी याची रीतसर निवडणूक आयोगात तक्रार करणार आहे.” असे म्हटले आहे.
दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, मुख्य लढत शिवसेनेच्या शिंदे गटाचे किशोर दराडे आणि शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर भावसार यांच्यात असल्याचे बोललं जात आहे.