जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी समोर आलीय. ती म्हणजेच ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी शिवसेना (उबाठा) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होते. मात्र आता सुरेशदादा जैन यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे महाविकास आघाडी विशेषतः ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
सुरेश दादा जैन यांनी रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टीकोण असणाऱ्या पक्षाला आपला पाठिंबा राहील असे माध्यमांशी बोलतांना सुरेशदादा जैन यांनी सांगितले. दरम्यान आज ग्रामविकासमंत्री गिरीश माहाज, महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ ,आ. राजूमामा भोळे,प्रताप पाटील यांनी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी बोलताना सुरेश दादा जैन म्हणाले कि, खान्देश माझी जन्मभूमी व जळगाव माझी कर्मभूमि राहिलेली आहे. सर्व जळगावकरांना मी माझ्या परिवाराचा सदस्य म्हणून मानतो. मी नेहमी जळगावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो आहे. विकासाशिवाय पर्याय नाही. मग तो भारतदेशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा किवा जळगावचा असो. विकासामुळे देशात वेगवेगळ्या क्षेत्नांमध्ये प्रगतीच्या कक्षा रुंदावतात त्यात शिक्षण, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा (रेल्वे, रस्ते, विमान सेवा, पिण्याचे पाणी, घरकुल इ.), याच कडीत भारत देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी उद्योगाची साखळी निर्माण करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात अशा अनेक गोष्टीमुळे सकारात्मक बदल घडून भारत जगाच्या पाठीवर एक वेगळे स्थान निर्माण करेल ही शाश्वती आहे.
जळगाव जिल्हावासियांना केलं आवाहन
यावेळी सुरेशदादा जैन यांनी जळगावकरांना आवाहन केलं आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जळगाव जिल्हावासियांना माझी आग्रहाची विनंती आपण आपल्या जळगाव जिल्हाच्या विकासासाठी आपले बहुमुल्य मत जळगाव मतदार संघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर मतदार संघाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या कमळ या चिन्हाला मत देऊन मोदींजीचे विकसीत भारत घडविण्यासाठी हात बळकट करुया असे. आवाहन सुरेशदादा जैन यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.