जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. 2047 च्या विकसित भारताचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर मोठा भर देण्यात आला आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात जळगाव शहरासाठी 22.5 कोटींचा भरीव निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली आहे. या निधीमुळे शहरातील महत्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून नागरिकांना दर्जेदार रस्त्यांचा लाभ मिळेल, असा विश्वास शहरवासीयांनी व्यक्त केला आहे.

आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांमुळे जळगाव शहरात गेल्या काही वर्षांत विकासाचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांसह अन्य पायाभूत सुविधांची अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे सध्या वेगाने सुरू आहेत. या विकासामुळे शहराचा चेहरामोहरा बदलत असल्याचेही स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे.

यावर्षीच्या अर्थसंकल्पात ₹22.5 कोटींचा भरीव निधी मंजूर झाला आहे. या निधीचा वापर शहरातील अनेक महत्वाच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी केला जाणार आहे. त्यामध्ये शिवकॉलनी – वाघनगर – गाडगेबाबा चौक (100 फुटी रस्ता) चे काँक्रिटीकरण, टॉवर चौक-नेहरू चौक-मनपा रस्ताचे काँक्रिटीकरण, हायवे समांतर रस्त्याच्या उर्वरित कामे केली जाणार आहेत.
या कामांमुळे नागरिकांना प्रवास सुलभ होईल तसेच विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केला. दरम्यान, या निधीसाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनित्रा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.












