
जळगाव लाईव्ह न्यूज । कल्याणकारी निधीतून माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वी, १२ वी तसेच पदवी परीक्षेत किमान ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्यामार्फत शिष्यवृत्तीसाठी प्राप्त अर्जांची छाननी करून प्रत्येक संवर्गातील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात येईल. त्यानुसार शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार आहे. इयत्ता १० वी व १२ वी तसेच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी एकरकमी शिष्यवृत्ती वितरित करण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२७ असून, प्राप्त अर्जांची छाननी २० जानेवारी २०२७ पर्यंत करण्यात येणार आहे. पात्र माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निलेश प्रकाश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.





