⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा जैन फूडपार्कला अभ्यासदौरा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातील विद्यार्थ्यांचा जळगाव शहरालगत असलेल्या जैन इरिगेशन अंतर्गत फूडपार्क येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी रायसोनी अभियांत्रिकीचे ऑकडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांच्या सहकार्याने या दौऱ्याचे नियोजन केले होते. या क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते. या बाबी विद्यार्थ्यांना समजाव्यात तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. कच्चा मालावर प्रक्रिया करून पक्का माल कशा पद्धतीने तयार केला जातो. त्याची साठवणूक, हिशोब पद्धती, वितरण पद्धती या सर्व बाबींची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नेऊन समजावी व त्याचा उपयोग भावी काळात व्हावा यासाठी या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते

अभ्यास दौऱ्याची सुरुवात जैन इरिगेशनच्या गांधी तीर्थ या मनमोहक वास्तूच्या दर्शनाने झाली. दीड वर्षाच्या विक्रमी वेळेत निर्माण करण्यात आलेली हि सुंदर कलाकृती पाहून विद्यार्थी हरखून गेले. महाराष्ट्रातील किंबहुना देशातील ऑग्रीकल्चर क्षेत्रातील बळकटीकरणासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या जैन इरिगेशन अंतर्गत सुरु असलेल्या फूडपार्कला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची कार्यपद्धती आणि कामकाज जाणून घेण्याची संधी रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळाली.

येथील फूड पार्कमधील जनसंपर्क अधिकारी तौशीफ देशपांडे व रमेश सूर्यवंशी यांनी जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड ही जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडची उपकंपनी आहे. जैन फार्म फ्रेश हे जगातील सर्वात मोठे आंबा प्रोसेसर आणि निर्जलित कांद्याचे जगातील दुसरे सर्वात मोठे प्रोसेसर आहे. कंपनी सुमारे 1600 कोटींचा व्यवसाय करते. आंबा, पेरू, केळी, पपई, स्ट्रॉबेरी, जामुन, टोमॅटो,कांदा, लसूण आणि आले यासारख्या निर्जलित भाज्या आणि मसाल्यांच्या व्यवसायातही प्रवेश केला आहे असे त्यांनी सांगितले. सरतेशेवटी चर्चासत्रांची सांगता प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने झाली.

रायसोनी महाविद्यालयाच्यावतीने प्रा जितेंद्र वडद्कर, प्रा. प्रिया टेकवानी, प्रा. तुषार वाघ, प्रा. स्वाती बाविस्कर यांनी या अभ्यास दौऱ्याचे समन्वय साधले तर जैन इरिगेशनच्या फूडपार्कचे विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित प्राध्यापकांनी आभार मानले. तसेच या अभ्यास दौऱ्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.