⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

SBI ने ग्राहकांना दिला मोठा झटका, आजपासून ‘हा’ नवीन नियम लागू

जळगाव लाईव्ह न्युज । १५ जुलै २०२२ । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे. ती म्हणजे SBI कडून कर्ज घेणे महाग होणार असून नवीन आणि जुन्या ग्राहकांचा EMI देखील वाढणार आहे. SBI ने आपल्या कर्ज दराची सीमांत किंमत (SBI MCLR Hike) वाढवली आहे. बँकेने MCLR वाढवण्याची घोषणाही केली आहे. नवीन दर 15 जुलैपासून लागू होतील. याआधी जूनमध्येही SBI ने MCLR वाढवला होता.

SBI ने दिला मोठा धक्का
विशेष म्हणजे, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर जवळपास सर्व सरकारी आणि गैर-सरकारी बँकांनी गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. वास्तविक, आधी आरबीआयने मे महिन्यात रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली होती, त्यानंतर जूनमध्ये रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. सध्या रेपो दर 4.90 टक्के आहे.

SBI ने अधिसूचना जारी केली
विशेष म्हणजे या वर्षी एप्रिलपासून SBI आपला MCLR वाढवत आहे. जूनमध्ये, त्याने MCLR 20 बेसिस पॉइंट्सने वाढवला होता. SBI ने MCLR वाढवण्याची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार,
एका वर्षाच्या कर्जासाठी MCLR 7.40 वरून 7.50 टक्के करण्यात आला आहे.
सहा महिन्यांच्या कर्जासाठी MCLR 7.35 वरून 7.45 टक्के करण्यात आला आहे.
दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी MCLR 7.70 टक्क्यांवरून 7.80 टक्के करण्यात आला आहे.

इतर बँकांनीही MCLR वाढवला आहे
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर अलीकडच्या काळात अनेक बँकांनी एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. यामध्ये एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचाही समावेश आहे. ICICI बँकेने सर्व मुदतीच्या कर्जासाठी MCLR 20 बेस पॉईंटने वाढवला आहे.