भुसावळच्या रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘या’ दोन विशेष गाड्यांना मिळाला नियमित दर्जा

ऑगस्ट 16, 2026 10:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता आहे. भुसावळ मार्गे धावणाऱ्या दादर–गोरखपूर आणि दादर–बलिया या विशेष रेल्वेगाड्यांना आता नियमित मेल/एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या गाड्या यापुढे नियमित क्रमांकाने धावणार असून, भुसावळ स्थानकावर थांबा असल्याने मुंबई जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होऊ शकणार आहे.

railway 2 jpg webp

दादर–गोरखपूर विशेष गाडी क्रमांक ०१०२७ आता ११०४७ दादर–गोरखपूर एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. ही गाडी १८ ऑगस्टपासून नियमित होणार असून दादरहून मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशा आठवड्यातून चार दिवस सुटेल. दादरहून दुपारी २.०५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे २.५५ वाजता गोरखपूर येथे पोहोचेल.

याच मार्गावरील गोरखपूर–दादर विशेष गाडी क्रमांक ०१०२८ चे ११०४८ गोरखपूर–दादर एक्स्प्रेस असे रूपांतर करण्यात आले आहे. ही गाडी २० ऑगस्टपासून नियमित धावेल. गोरखपूरहून सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी दुपारी २.२० वाजता सुटणारी गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ३.३५ वाजता दादरला पोहोचेल.

दादर–बलिया मार्गालाही नियमित सेवेचा लाभ

दादर–बलिया मार्गावरील विशेष गाडी क्रमांक ०१०२५ आता ११०४३ दादर–बलिया एक्स्प्रेस या क्रमांकाने धावणार आहे. १७ ऑगस्टपासून ही गाडी नियमित होईल. दादरहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी दुपारी २.०५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे १.४५ वाजता बलियाला पोहोचेल.

बलिया–दादर विशेष गाडी क्रमांक ०१०२६ चे ११०४४ बलिया–दादर एक्स्प्रेस असे रूपांतर करण्यात आले आहे. १९ ऑगस्टपासून ही सेवा नियमित होणार असून, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी बलियाहून दुपारी ३.१५ वाजता गाडी सुटेल. तिसऱ्या दिवशी पहाटे ३.३५ वाजता दादरला पोहोचेल.

या गाड्यांना कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बीना, ललितपूर, टीकमगड, छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट, माणिकपूर, प्रयागराज, ज्ञानपूर रोड आणि बनारस यांसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

१७ डब्यांची गाडी, प्रवाशांना विविध पर्याय

नियमित करण्यात आलेल्या या एक्स्प्रेस गाड्यांना प्रत्येकी १७ डबे असतील. यात १ एसी २-टियर, ३ एसी ३-टियर, ७ स्लीपर, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड सीटिंग-कम-गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. त्यामुळे विविध श्रेणीतील प्रवाशांना आपल्या सोयीनुसार प्रवास करता येणार आहे.

विशेष गाड्यांचे नियमित एक्स्प्रेसमध्ये रूपांतर झाल्यामुळे आरक्षण करताना जुन्या विशेष गाडी क्रमांकाऐवजी नवीन नियमित क्रमांकाचा वापर करणे आवश्यक आहे. प्रवाशांनी तिकीट आरक्षण करण्यापूर्वी गाडीचा क्रमांक, धावण्याचा दिवस आणि वेळ तपासून घ्यावी. प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रक आणि स्थानकनिहाय थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत प्रणालीवर किंवा एनटीईएसवर तपासणे आवश्यक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now